जळगांव जामोद,दि६(प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथून सायकलने घरी परतत असताना गौलखेड गावठाणाजवळ रेतीने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दादुलगाव येथील लक्ष्मण फासे (६०) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ४ मार्च रोजी रात्री ९:३० च्या सुमारास घडला आहे.
उपचारासाठी खामगावला नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अपघातस्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झाला असून, रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
लक्ष्मण फासे हे दररोज सकाळ-संध्याकाळ दूध विकण्यासाठी पिंपळगाव काळे येथे जात होते. ४ मार्च रोजी दूध विकून सायकलने घरी परतत असताना रात्री ९:३० वाजता दरम्यान रेतीने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच दादुलगावसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. महसूल प्रशासनाने दखल घेत अपघातस्थळी धाव घेऊन रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पंचनामा करून पोलिस स्टेशन जळगाव जामोद मध्ये जमा केले आहे.
मुलगा महेंद्र लक्ष्मण फासे यांच्या फिर्यादीवरून वडील सायकलने घरी येत असताना आरोपींची ताब्यातील विनापरवानाचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालून फिर्यादीचे वडील समोरून धडक देऊन त्यांचे मरणास कारणीभूत झाला आहे अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप.नी अमोल पंडित करीत आहे.