मंगेश राजनकार
जळगाव जामोद,दि१( प्रतिनिधी):
जळगाव जामोद पंचायत समितीच्या आवारात आमसभा व सरपंच मेळाव्याचे आयोजन दिनांक २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ संजय कुटे,तहसीलदार पवन पाटील,गट विकास अधिकारी संदीप मोरे, तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ उज्वला पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. जळगाव जामोद तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या शासन दरबारी उघडपणे मांडता येऊन त्या निकाली लागाव्यात याकरिता आमसभा हे एक व्यासपीठ आहे. या आमसभेत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम, जल जीवन मिशन, पाणी पुरवठा, भुमी अभिलेख, महावितरण, महसुल, पंचायत समिती आदी विभागातील समस्या व तक्रारी जाहीरपणे व्यक्त केल्या नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊन नागरिकांना आश्वस्थ करण्यात आले. तर आवश्यक त्या ठिकाणी स्थळ पाहणी करुन अथवा कागदपत्रे पाहून अल्पावधीतच निर्णय घेण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना आ संजय कुटे यांनी दिल्या.

यावेळी आ डॉ संजय कुटे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी संदीप मोरे व शासन स्तरावर तसेच शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या अधिकारी, सरपंच. शिक्षक यांचा यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रत्येक नागरिकाचे काम करणे वेगवेगळे विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम आहे त्यसाठी शासनाने लोककल्याणकारी व्यवस्था उभी केली आहे. तालुक्यातील शेवटच्या घटकांचे गाऱ्हाणे ऐकणे मी माझे कर्तव्य समजतो असे आ संजय कुटे म्हणाले. तसेच शिक्षण, सिंचन, इंन्फ्रास्टक्चर हे विकासचे व्हिजन असून सन २०३४ पर्यंत पूर्ण करून जळगाव जामोद मतदारसंघ राज्याच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवणार असेही ते यावेळी म्हणाले.
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त सचिव विजय ढगे यांचा आ संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या आमसभेला तालुक्यातील सर्व सरपंच, क्षेत्रीय स्तरावरील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, केंद्रप्रमुख, शिक्षक माजी जि. प. तथा पं. स. सदस्य यांच्यासह कर्मचारी बांधव, पत्रकार बांधव यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या दरम्यान प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला यापुढे विनामूल्य पाच ब्रास रेती देण्यात येईल असे तहसीलदार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर आणि शुभांगी सोळंके यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी सावरकर यांनी केले.