मागणी केलेले खत न देता दिले दुसरे खत: कृषी विभागाकडे तक्रार.
जळगांव जामोद,दि.२१(प्रतिनिधी):
शेतकऱ्याने मागणी केलेले खत न देता दुसरे खत देण्याचा प्रकार कृषी केंद्र चालकाने करून फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी रविंद्र धुळे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
शेतकरी रविंद्र धुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,शेतीला खत घेण्यासाठी दि.२१ रोजी स्थानिक साई कृषी केंद्र येथे गेले असता महाधन कंपनीच्या खताची विचारपूस केली,त्यानूसार कृषी केंद्र चालकांनी महाधन कंपनीचे दाणेदार झिंक, बोरॉन खत व इतर दोन खतांची असे बिल देवून त्यांच्याकडून रू ५९३०/-एवढी रक्कम घेतली. मात्र प्रत्यक्षात महाधन कंपनीचे दाणेदार खत न देता अपरिचीत कंपनी आरती महासुपर महाझिंबो या कंपनीचे खत दिले. शेतकऱ्याने ते खत सूनगांव येथे भाडयाचे वाहनाने नेले.मात्र खत काढतांना चुकीचे खत देण्यात आल्याचे लक्षात येताच त्यांनी कृषी केंद्र चालकाशी संपर्क करून मागणी केल्यानूसारच खत हवे आहे,खत बदलून देण्याची विनंती केली. परंतु साई कृषी केंद्राचे चालक यांनी स्पष्ट नकार देवून मी तुम्हाला योग्य तेच दाणेदार खत दिले आहे आणि ते परत घेणार नाही तुम्ही माझी तकार करू शकता असे सांगितले.मागणी केलेले खत न देता दुसरे खत देण्यात आल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी शेतकऱ्याची आहे.