महावितरणच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय.
मंगेश राजनकार
जळगाव जामोद,दि.७ (प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा शिवारातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत मिळत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांना शासन नियमानुसार रोज आठ तास वीज मिळणे बंधनकारक आहे, मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा हक्क नाकारला जात आहे. या विरोधात समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्कप्रमुख शेख सईद शेख कदीर यांनी उपकार्यकारी अभियंता महावितरण जळगाव जामोद यांना निवेदन सादर करत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे हाल.
महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा मिळत नाही.अनेक वेळा वीज पुरवठा अचानक खंडित केला जातो किंवा वारंवार तांत्रिक बिघाडाच्या कारणाने शेतकऱ्यांची मोटारी बंद पडतात. परिणामी विहिरींमध्ये आणि बोरवेलमध्ये पाणी उपलब्ध असूनही त्याचा योग्य वापर करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
महावितरण कार्यालयाकडून उडवा-उडवीची उत्तरे!
शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय, जामोद येथे वारंवार तक्रारी दिल्या असताना देखील उडवा-उडवीची उत्तरे मिळतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या उपकेंद्रावर जास्त भार असल्याने शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा देणे शक्य नाही. मात्र, हा प्रश्न महावितरणनेच सोडवायला हवा शेतकऱ्यांना यासाठी जबाबदार धरता येणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ह्या आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
१. शासन नियमानुसार शेतकऱ्यांना रोज ८ तास नियमित वीजपुरवठा मिळावा.
२. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी.
३. वीजपुरवठ्याशी संबंधित तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त करावेत.
४. शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये, त्यांना त्वरित सेवा मिळावी.
शेतकरी हा कुठल्याही प्रकारचा अभियंता नाही तो फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याला आवश्यक सुविधा मिळणे हा त्याचा हक्क आहे. जर लवकरच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर समाजवादी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेख सईद शेख कदीर यांनी दिला आहे.