श्री बेंबळेश्वर संस्थान येथे भाविकांची मांदियाळी,आज भव्य महाप्रसादाचे आयोजन
जळगांव जामोद,दि२७(प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या जामोद येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भव्य भंडारा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे जामोद हे गाव जळगाव जामोद तालुक्यापासून पूर्वेस ११ किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक वारसा लाभलेले, सातपुड्याच्या कुशीत वसलेले गाव आहे जळगाव जामोद तालुक्याला सुद्धा ‘जळगाव जामोद’ हे नाव जामोद नावाच्या छोट्या गावातूनच विकसित झालेले आहे जामोद गावाला आनंदाचे ठिकाण म्हणून देखील संबोधण्यात येते एकेकाळी मुघल बादशहा शहाजहान ची पत्नी मुमताज महल शहाजहानच्या सैन्याच्या मोहिमेवर जात असताना तिला जामोदमध्ये गरोदरपणात अडचणी येऊ लागल्या व त्यामुळे जळगाव जामोद पासून ५० किलोमीटर असलेल्या मध्य प्रदेशातील बुरहानपुर शहरात तिचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मोगलांनी जिथे तिला अडचणी,त्रास सुरू झाला त्या ठिकाणाला जा-ए-मौत (मृत्यूचे ठिकाण) हे गाव म्हटले.जामोद’ हे नाव मोगल सम्राटांनी दिले. जा-ए-मॉट हा पर्शियन शब्द होता. ज्याला नंतर स्थानिक लोक जा-मऊत, जा-मोद किंवा ‘जामोद’ म्हणतात.तसेच जामोद येथे प्राचीन काळी विराट नावाचा राजा राज्य करीत होता. त्यामुळे आजचे जामोद हे विराट नगर म्हणून देखील प्रसिध्द होते. गावात आजही पुरातन अवशेष आढळतात. गावाच्या उत्तरेला पेव मंडई भागात आजही सातभाईची हवेली, जुने भुयार बालकराम मंदीर, तलावातील सुर्यमंदीर पिरपोलाद शहा बाबाचा दरगाह,जागृत महाकालेश्वर मंदीर व जैन धर्मियांचे दिगंबरी पंथाचे जैन मंदीर ६०० वर्षा पूर्वीचे पुरातन असल्याचा उल्लेख गिनीज बुकमध्ये आढळते.या सर्वामध्ये भर आणि विशेषता म्हणजे जामोद वासियांचे जागृत असलेले आराध्य दैवत श्री भगवान शंकराचे श्री बेंबळेश्वर मंदीर पूर्व दिशेला वाहणाऱ्या दोन नद्यांच्या संगमावर हे मंदीर प्राचीन काळापासून वसलेले आहे. हे मंदीर यादव घराण्याने बांधल्याचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत हाेते. या मंदीरात प्रवेश करताच समोर हनुमान मुर्ती व श्री गणेशजींची मूर्ती दृष्टीस पडते. गाभाऱ्यात उतरल्यानंतर श्री शंकर भगवानांच्या शिवलींगाचे दर्शन घडते. या मंदीरात दक्षिण बाजुला पाण्याचा कुंड आहे. या कुंडाविषयी गावातील आबाल वृध्दांच्या सांगितल्याप्रमाणे पांडव अज्ञातवासात असतांना या ठिकाणी आले होते. पाण्याच्या शोधार्थ असतांना अर्जुनाने या ठिकाणी बाण मारल्याने कुंड तयार,होवून पाणी वर आले होते. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त शिवालयाची रंगरंगोटी विद्युत रोषणाई करून पूर्ण परिसर स्वच्छ केला जातो.
रंगरंगोटी करून सजवलेले देवालय आपल्या भक्तजनांच्या स्वागतासाठी तयार होते. दीप माळेतील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश प्रभातीच्या धूसर वातावरणात दूरवर पसरताे.सारे वातावरण मंगलमय होते.उत्सव एक दिवसाचा असतो परंतु या उत्सवाची नागरिक महिन्याभरापासूनच तयारी करु लागतात महाशिवरात्री उत्सव म्हणजेच भाविकांसाठी आनंदाची पर्वणीच असते नोकरीधंद्याच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेली माणसे या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात.महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सासरी गेलेली लेक सुद्धा माहेरी येत असतात.श्रद्धा भाव इथे प्रकर्षाने दिसून येतो.महाशिवरात्रीच्या उत्सवाने गाव गजबजून जातं तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी अन्नदात्यांकडून भक्तगणांसाठी उपवासाच्या फराळाची सुद्धा व्यवस्था करण्यात येत असते.येथे भजन कीर्तन तसेच भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते व शिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. येथील दहीहांडीच्या प्रसादाला विशेष महत्व असते. या महाप्रसादाकरिता जामोद परिसरातील १५ ते ३० गावातून भाविक भक्त दाखल होत असतात.
भाविकांसाठी भव्य महाप्रसाद तयार करण्याचे काम परिसरातील शेकडो नागरिक एकत्रित येऊन करतात
मिश्र डाळींचे वरण व ज्वारीची भाकरी असे महाप्रसादाचे स्वरूप असते
या प्रसादामुळे अनेक व्याधी व दुःख नाहीसे होतात असा भक्तांचा विश्वास आहे. तसेच या मंदीर परिसरातच त्र्यंबकेश्वर मंदिर, हनुमान मंदीर तसेच तीन मंदीर संत तुळशीराम बाबा यांचे समाधी मंदीर आहे.मंदीराच्या परिसरातच नयनरम्य वातावरण असून मोठ-मोठे जुने वड पिंपळाची झाडे आहेत. तसेच या गावाला अनेक थोर विभुतीचे पदस्पर्शाने पावन केले आहे. उदा. शेगावचे संत गजानन महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नामदेव महाराज, महाभारतकालीन पांडव सुध्दा येथे येवून गेलेत. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या जागृत देवस्थान असलेल्या श्री बेंबळेश्वर संस्थानला आपणही भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
कु. वैष्णवी नामदेवराव उमाळे जामोद