जळगाव जामोद ,दि२५(प्रतिनिधी):
तालुक्यामध्ये तसेच शहरात दिवसा ढवळ्या सुद्धा चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून जळगाव जामोद पोलीस स्टेशन चोरीच्या घटना थांबवण्यात अपयशी होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.अशीच एक घटना जळगाव शहरामध्ये घडली असून त्यामध्ये शहरातील व्यावसायिक गोविंद भिकारीलालजी अग्रवाल यांच्या देशी दारू दुकानाचे मॅनेजर अभिमन्यू देवकर आणि बाबुराव चोपडे ३ लाख ३४ हजार रुपयाची रोख रक्कम अग्रवाल यांच्या घरी घेऊन जात असताना शहरांमधील दुर्गा चौकातील शर्मा स्किन केअर हॉस्पिटल जवळ एका अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून पळ काढला असुन ही घटना दि २१ फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. घटनेची तक्रार मॅनेजर बाबुराव चोपडे यांनी पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात अप.नं १०२/२०२५ कलम ३०४(२) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अद्याप आरोपीचा शोध लागला नसून पोलीस तपास सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नारायण सरकटे करीत आहेत. जळगाव जामोद तालुक्यात सतत होणाऱ्या चोरीचे प्रमाण वाढल्याने तालुक्यातील व्यापारी वर्ग घाबरलेल्या स्थितीत असून भर दिवसा व्यापाऱ्याची होणारी लुटमार यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून व्यवसायासाठी लागणारी कॅश रक्कम कशी सुरक्षित ठेवावी याबाबत चिंता वाढली आहे.