शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक -केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
बुलढाणा, दि. 24 (जिमाका):
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रेरणादायी आणि समाजाला स्फूर्तीदायक असल्याच प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी येथे केले.
आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी, या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व भारतीय स्थानिक रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 फेब्रुवारीला बी ए पी एस हिंदू मंदिर अबुधाबी येथे शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे होते. तर अतिथी म्हणून मालोजी राजे शाहू छत्रपती, खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा गौरवशाली असून आजच्या पिढीला प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजवटीमध्ये लोकांच्या हिताची कामे केलीत. अशा स्वरूपाची कामे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सातासमुद्र पार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा केला जातो. हे मराठी माणसासाठी आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी अबुधाबी येथील मराठी माणसांसोबत त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला अबुधाबी येथील मराठी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.