जळगाव जामोद,दि२३(प्रतिनिधी):
शहरातील सर्व नागरिकांनी नगर परिषदेकडील घरपट्टी कर वेळेत भरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घरपट्टी ही नगर परिषदेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असून, शहराच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधांच्या सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
नगर परिषदेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, घरपट्टी भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत ऑनलाइन पद्धतीने कर भरावा. तसेच, वसुलीसाठी नगर परिषदेने ६ विशेष पथके स्थापन केली असून, नागरिकांना त्यांच्याकडे थेट कर भरता येईल.
नगर परिषदेने मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून त्यांच्यावर सर्वप्रथम कारवाई केली जाईल. ठरलेल्या वेळेत कर न भरल्यास विलंब शुल्क किंवा दंड आकारला जाणार आहे.
शहराच्या स्वच्छता व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि अन्य नागरी सुविधांसाठी घरपट्टीचे वेळेवर संकलन होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने घरपट्टी भरून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.