पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा ८ ते २३ मार्च दरम्यान यात्रा महोत्सव ४-५ लाख भाविक येण्याची शक्यता
बुलढाणा, दि. १८ :
बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे सैलानी बाबा यात्रा महोत्सव दि. ८ ते २३ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. या यात्रा महोत्सवात आवश्यक सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी सोमवारी त्यांच्या कार्यालयात यात्रेच्या पूर्व तयारीची समन्वय सभा घेतली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी सैलानी यात्रा महोत्सवात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय, परिसर स्वच्छता, पोलिस बंदोबस्त आदी सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी आढावा घेत म्हणाले की, या यात्रेत देशभरातून ४-५ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे, महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे, विद्युत सुविधा पुरविणे, स्वच्छता गृह तयार करणे, पार्किंग व्यवस्था निर्माण करणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, पोलीस बंदोबस्त, बॅरिकेट्स, आरोग्य कक्ष व औषधींचा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.