मंगेश राजनकार
जळगाव जामोद,दि११(प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी विदर्भ, खान्देश व मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या श्री क्षेत्र धानोरा महासिध्द उदयापासून भव्य यात्रेला प्रारंभ होत आहे.

सुरुवातीला ही यात्रा एक महिना चालत असे आता आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवादरम्यान परिसरातील वातावरण आनंदमय असते. सर्व जातीधर्माचे लोक राष्ट्रीय एकात्मता ठेवून यात्रेचा आनंद घेतात. धानोरा व परिसरातील लग्न झालेल्या मुली दिवाळीसारख्या यात्रेला माहेरी येतात, त्यामुळे या परिसरात पाहुण्यांची लगबग असते. माघ शु पौर्णिमेला विविध धार्मिक कार्यक्रम येथे होत असतात. गावामधून टाळ मृदंगाच्या निनादात व श्री महासिद्ध महाराजांच्या जयघोषात ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक निघत असते. यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे कुंभार वाड्यातील आवा लुटन्याचा कार्यक्रम ज्या भक्ताची मनोकामना पूर्ण झाली असे भक्त खास पेहराव परिधान करून डफड्याच्या गजरात मयूर पंख हातात घेऊन भक्ताचा नाचन्याचा कार्यक्रम सादर करीत असतात तसेच कुत्रोत्सव कार्यक्रम सुद्धा थाटात साजरा होत असतो.भक्तांनी यात्रेत सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन महासिद्ध महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
यात्रेकरूंच्या मनोरंजनाकरिता फिरते चित्रपट गृह, मौत का कुवा, मोठमोठे आकाशी पाळणे, इतर मनोरंजनाची साधने यात्रेत सज्ज झाली आहेत.